आशादीप प्रकरणातील कथित समाजसेवक अटकेत; विनयभंगाचा गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । अशादीप वसतीगृह प्रकरण अंगात आणून अवास्तव दावे करणार्‍या कथित समाजसेवकाच्या विरूध्द महिलेला पोलीसांना हवा तो जबाब देण्यासाठी धमकावत विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मध्यंतरी शहरातील आशादीप महिला वसतीगृहाचे प्रकरण खूप गाजले होते. याची देश पातळीवर चर्चा झाली होती. तथापि, चौकशीअंती असा प्रकार घडलाच नसल्याचे उघडकीस आल्याने याबाबत सविस्तर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने संबंधीतांचे जबाब घेतले जात आहेत.

याच प्रकरणी शहरातील समता नगर भागातील रहिवासी असणार्‍या महिलेचा जबाब पोलिसांनी घेतला. संबंधीत प्रकार घडला तेव्हा या महिलेची मुलगी आशादीपमध्ये होती. यानंतर या तरूणीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. परिणामी सत्यशोधन करणार्‍या पथकाने संबंधीत महिलेचा जबाब घेतला. यात तिने वसतीगृहात असला कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.

दरम्यान, साहिल पठाण या तरूणाने संबंधीत महिलेला त्याच्या म्हणण्यानुसार जबाब देण्यासाठी धमकावत तिचा विनयभंग केला. यामुळे त्या महिलेने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पठाणच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल पठाण हा जननायक फाऊंडेशनचा पदाधिकारी असून त्यानेच आशादीप वसतीगृहातील प्रकरणाचा बोभाटा केला होता. आता चौकशीत हा प्रकार समोर येण्याची शक्यता असल्याने तो जबाब देणार्‍यांवर दबाव आणत असल्याचे दिसून येत असून या अनुषंगाने संबंधीत महिलेला धमकावल्याची शक्यता आहे. पठाणला पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

Protected Content