पहूर ता जामनेर प्रतिनिधी । गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले पहूर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या बदलीचे संकेत मिळाले असल्यामुळे परिसरातून नाराजीचा सुर उमटला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्ह्यात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असलेल्या अधिकार्यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार पहूर पोलीस स्टेशन चे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांचा जळगाव जिल्ह्यात मार्च२०१९ मध्ये तीन वर्षांचा कार्य काळ पूर्ण होत असल्याने त्यांची बदली प्रक्रिया सुरू झाली असून फेब्रुवारी अखेर शिरसाट पहूर येथून बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. याला साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाट यांनीही दुजोरा दिला आहे. अर्थात प्रशासकीय नियमांनुसार शिरसाठ यांची बदली होणार असली तरी यामुळे परिसरातून नाराजीचा सुर उमटू लागला आहे.
सप्टेबर २०१८मध्ये मेहूणबारा येथून पहूर पोलीस स्टेशन मध्ये सपोनि दिलीप शिरसाट यांची नियुक्ती झाली. या पाच महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय धडाकेबाज कामगिरी करून लोकप्रियता मिळवली आहे. यामुळे काही अवैध धंदे औरंगाबाद जिल्ह्यात स्थलांतरीत झाले आहेत. त्यांनी पोलीस कर्मचार्यांना शिस्तीचे धडे देऊन कायदा व सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य दिले. विशेष म्हणजे स्थानिक राजकारण्यांच्या हस्तक्षेपाला त्यांनी जुमानले नाही. अशा कर्तृव्यदक्ष अधिकार्याने अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून पहूरकरांच्या मनात स्थान प्राप्त केले आहे. यामुळे प्रशासकीय नियमानुसार त्यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी यामुळे परिसरातील जनता नाराज झाल्याचे दिसून येत आहे.