जळगाव प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीतर्फे करण्यात येणारी कारवाई ही आकसातून करण्यात येत असल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची सध्या सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. ही कारवाई राजकीय सूडापोटी करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी आधीच केला आहे. आता या प्रकरणी जिल्हा राष्ट्रवादीने आंदोलन करून आपण नाथाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले आहे.
आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ईडीचा निषेध केला. ईडी झाली येडी…सह अन्य घोषणांनी परिसर दणाणून निघाला. या आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, कल्पना पाटील, वाल्मीक पाटील, विनोद देशमुख, अशोक लाडवंजारी, बंडू भोळे, स्वप्नील नेमाडे, कल्पीता पाटील, नामदेवराव चौधरी आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी रवींद्रभैय्या पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीने नेहमीच टार्गेट केले आहे. नाथाभाऊ आधीच्या चौकशीत निर्दोष सिध्द झालेले आहेत. न्यायदेवता सर्वश्रेष्ठ असून नाथाभाऊ यातून निर्दोष म्हणून समोर येणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, नाथाभाऊंना झोटींग समितीने आधीच निर्दोष असल्याचे सांगितले आहे. तसेच अन्य चौकशांमधूनही त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. यामुळे आता त्यांना मुद्दामहून यात अडकवण्यात येत असून चौकशीतून सत्याचा विजय होणार असल्याचे देवकर म्हणाले.
दरम्यान, जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन ईडीच्या कारवाईचा निषेध केला.
खालील व्हिडीओत पहा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केलेली निदर्शने
https://www.facebook.com/508992935887325/videos/258377029425714