जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जाहीर करण्यात येणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणीत पॅनलला दणदणीत बहुमत मिळाले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला १०; शिवसेनेला ७ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला ३ जागा मिळाल्या. तर भारतीय जनता पक्षाचे एकमेव संचालक निवडून आले आहेत. दरम्यान, निकाल लागल्यानंतर आता बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची सूत्रे नेमकी कुणाकडे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या म्हणजेच ३ डिसेंबर रोजी बँकेत आयोजीत करण्यात आलेल्या विशेष बैठकीत याची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
तत्पूर्वी आज जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीआधी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची अजिंठा विश्रामगृहात बैठक होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह नवनियुक्त संचालकांची उपस्थिती राहणार आहे. यातच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला आणि या पदांसाठीची नावे निश्चीत होणार आहे. यामुळे या बैठकीत नेमके कुणाचे नाव समोर येते याकडे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोण संचालक बसेल हे ठरवण्याचे सर्वाधिकार एकनाथ खडसे यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ते शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीत उमेदवाराचे नाव जाहीर करतील. शिवसेनेलाही त्यापूर्वी आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरवावा लागणार आहे. तीन डिसेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव आघाडीवर असले तरी ऐन वेळेस काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे किशोरआप्पा पाटील, अमोल पाटील आदींची नावे चर्चेत आहेत. अर्थात, आजच्या बैठकीनंतर याबाबतचे चित्र हे स्पष्ट होणार आहे.