हिरापूरजवळ क्रूझर उलटली : तीन ठार, दोन गंभीर जखमी

चाळीसगाव/पाचोरा प्रतिनिधी | तालुक्यातील हिरापूर जवळ क्रूझर वाहन उलटून झालेल्या अपघातामध्ये तीन मजूर ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमी मजूर हे पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी आहेत.

या संदर्भात माहिती अशी की, एमएच १३-एसी-५६०४ या क्रमांकाच्या क्रूझर वाहनातून मनमाड येथून १२ मजूर हे पाचोरा येथे जात होते. हे सर्व रेल्वेत कंत्राटी काम करणारे मजूर होते. ते काम आटोपून घरी जात असतांना रात्री आठच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर जवळ त्यांचे क्रूझर वाहन अचानक उलटले. वाहकाचे क्रूझरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य ९ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये नाना भास्कर कोळी (वय ३३), विकास जुलाल तडवी (वय २९), मुक्तार तडवी (वय ३४, रा. सर्व डोंगरगाव, ता.पाचोरा) यांचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांना खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहेत. तर इतरांना किरकोळ मार लागला असून त्यांना चाळीसगावातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!