जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माय गिरणाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी गिरणा परिक्रमा केल्यानंतर आता खा. उन्मेषदादा पाटील यांनी गिरणा कप स्पर्धा आयोजीत केली असून यासाठी तब्बल एक कोटी रूपयांची पारितोषीके प्रदान करण्यात येणार आहेत.
काळाच्या ओघात राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे गिरणा नदीचे खोरे उद्वस्त झाले असून दोन्ही काठांवरील गावांची कधी काळी असणारी समृध्दी लयास गेली आहे. यामुळे गिरणेचे पुनरूज् जीवन करण्यासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी १ जानेवारी २०२२ पासून गिरणा परिक्रमा यात्रा सुरू केली. तब्बल पावणेचार महिन्यापर्यंत खासदारांनी गिरणेच्या दोन्ही काठांवरील गावांना भेटी देऊन आपली जीवनदायीनी गिरणा माता वाचविण्यासाठी जनजागृती केली. यानंतर त्यांनी आता वॉटर कप प्रमाणेच गिरणा कप स्पर्धा आयोजीत करण्याची घोषणा केली आहे. १ मे पासून ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात केवळ गिरणा काठालगतच्या गावांचा या स्पर्धेत समावेश केला जाणार आहे. १ मे रोजी भडगाव तालुक्यातील पिचर्डे या गावातून स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेचे उदघाटन अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासोबत एरंडोल तालुक्यातील उत्राण व भडगाव तालुक्यातील पिलखेडा या गावांमध्येदेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या अंतर्गत गावातील मृदा संधारणेसाठी झालेले काम, गावात नदीकाठी झालेले वनीकरण, वृक्षारोपण आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावाला यासाठी गुण देण्यात येणार आहेत. यातील पहिल्या क्रमांकाच्या गावाला खासदार निधीतून २५ लक्ष, दुसर्या क्रमांकाला २० लक्ष तर तिसर्या क्रमांकाला १५ लक्ष रूपयांचे पारितोषीक देण्यात येणार आहे. तसेच यात इतर पारितोषीकांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
गिरणा कप ही स्पर्धा १ मे ते १५ जून या कालावधीसाठी आयोजीत करण्यात आली असून यात गिरणा नदीचे संवर्धन हाच उद्देश या स्पर्धेचा आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नसून सर्वांनी आपल्या गिरणामाईला वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले आहे.