बीएचआर घोटाळ्यात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न : आ. मंगेश चव्हाण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | आपण बीएचआर पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज हे अवसायक येण्याच्या आधीच सनदशीर मार्गाने फेडले असून यानंतर आपण स्वत: अथवा कुटुंबाचा ही पतसंस्था, यातील घोटाळा अथवा आरोपींशी काडीचाही संबंध नसल्याचे प्रतिपादन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. प्रसारमाध्यमांमध्ये या संदर्भात आलेल्या वृत्तांवरून आपल्याल यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

बीएचआर सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुनील झंवर याला अटक झाल्यानंतर या प्रकरणात काही राजकीय मंडळीचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे रस घेऊन माहिती जमा करत असल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रांनी प्रसिध्द केले होते. याचे खंडन करण्यासाठी आज आमदार चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आज सायंकाळी पत्रकार परिषद घेतली.

याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, आपण गेल्या काही महिन्यांमध्ये विरोधी आमदार म्हणून सत्ताधार्‍यांविरूध्द प्रखर भूमिका घेतली आहे. सरकारच्या विरूध्द अनेक आंदोलने केली आहेत. तसेच गुटख्यासह अनेक अवैध धंद्यांच्या विरूध्द आवाज देखील उठविलेला आहे. यामुळे कुठे तरी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न यातून होत आहे. आपण आज लोकप्रतिनिधी असलो तरी याआधी व्यावसायिक आहोत. खूप कष्ट करून आपण उद्योग उभा केला असून यातून सुमारे दोनशे कोटींची उलाढाल होत असते. उद्योगासाठी अनेकदा पैशांची अडचण येत असते. या अनुषंगाने आपण २०१२ साली बीएचआर कडून दोन कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. याची फेड आणि २०१६ सालीच केलेली आहे. यानंतर आपला या पतसंस्थेचा आर्थिक गैरव्यवहार वा यातील प्रमुख आरोपींशी काडीचाही संबंध नाही. या खटल्यातील माहिती आपण ठेविदारांच्या हितासाठी मागितली असून यासाठी पत्र देखील दिलेले आहे.

याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी बीएचआरच्या सध्या सुरू असलेल्या तपासावरही भाष्य केले. ते म्हणाले की, या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई होणे अपेक्षित आहे. तथापि, यात फक्त मोजक्या संशयितांवरच कारवाई करण्यात आल्याची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अडकवण्याचे प्रयत्न होत असून आपण या प्रकारांना घाबरत नसल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी याप्रसंगी नमूद केले. तर प्रसारमाध्यमांनी ऐकीव माहितीवर अवलंबून न राहता, पुराव्यांवर आधारित बोलावे असेही ते म्हणाले. तर षडयंत्र करून आपल्याला यात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत केला.

खालील व्हिडीओत पहा आ. मंगेश चव्हाण नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/508992935887325/videos/230958025585866

Protected Content