जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजवर सहकारमध्ये प्रवेश न केलेले पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दुध संघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करत सहकारात दिमाखदार प्रवेश केला आहे.
ना. गुलाबराव पाटील यांची राजकीय कारकिर्द ही पंचायत समिती सदस्यापासून सुरू झाली होती. यानंतर ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. त्यांना सभापतीपदाची देखील संधी मिळाली. यानंतर ते आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री बनले. या वाटचालीत त्यांनी कधीही जिल्हा बँक वा अन्य सहकारी संस्थांची निवडणूक लढविली नाही. यंदा मात्र त्यांनी दुध संघाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यांनी जळगाव सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला. त्यांच्या समोर महापौर जयश्रीताई महाजन यांच्या सासू मालतीताई सुपडू महाजन यांनी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, रविवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे 260 इतकी मते मिळवून विजयी झाले.