जळगाव प्रतिनिधी । भास्कर मार्केटमधील मेडीकलचे दुकान उघडून ड्राव्हरला ठेवलेले 1 लाख 30 हजार रूपयांची रोकड अज्ञातांनी चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबत मेडीकल चालकाच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भास्कर मार्केटजवळील नाहाटा हॉस्पिटलच्या आवारात वर्धमान मेडीकल दुकान आहे. गेल्या 20 वर्षापासून दिनेश पारसमल राका मेडीकल दुकानाचे कामकाज पाहतात. मेडीकलमध्ये तीन कर्मचारी कामाला असून 26 रोजी रात्री 10.15 वाजता राका यांनी नेहमीप्रमाणे मेडीकल दुकान बंद केले. मेडीकल मधील 1 लाख 30 हजार रुपयांची रोकड त्यांनी काऊंटरच्या ड्राव्हरमध्ये ठेवली. त्यानंतर मंगळवारी सकाळी 7.45 वाजता हॉस्पिटलचे कपाऊंडर यांनी दिनेश राका यांना फोनकरून हॉस्पिटलचे साहित्य व पेशंटसाठीचे औषध लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळात दिनेश राका हे मेडीकलवर आले. त्यानंतर त्यांनी चाबी लावून दुकानातील कुलूप उघडले. यावेळी त्यांना दुकानातील काऊंटरजवळील ड्राव्हर उघडे दिसले. ड्राव्हरमध्ये असलेल्या डब्ब्यातून कोणीतरी अज्ञाताने 1 लाख 30 हजार रुपयांची रोकड लांबवून नेल्याचे समजून आले. चोरी झाल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. दरम्यान मेडीकल हॉस्पिटलच्या आवारात असल्याने पोलीसांनी याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याबाबत मेडीकलचे मालक दिनेश राका यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.