जळगाव एमडी ड्रग्स कनेक्शन! भुसावळमधून आणखी तिघे गजाआड

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगर भागात काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत साडेपाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या आणखी एका महत्त्वपूर्ण कारवाईत भुसावळमधून तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाच्या भुसावळ येथील घरात झडती घेतली असता, २ लाख ३७ हजार रुपये किमतीचे २३ ग्रॅम एमडी ड्रग्स पोलिसांच्या हाती लागले आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा मूळ तपास फेब्रुवारी महिन्यात शहर पोलिसांनी केला होता. शाहू नगरातील पडक्या शाळेजवळ राहणाऱ्या सर्फराज जावेद भिस्ती याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी ५ लाख ३४ हजार रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. त्यावेळी सर्फराज भिस्तीला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, सर्फराजने याकुब मोहम्मद खान (वय २६, रा. भुसावळ) याचे नाव उघड केले होते. तेव्हापासून पोलीस याकुबच्या मागावर होते.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना गुप्त माहिती मिळाली की याकुब खान जळगावात येणार आहे. त्यांनी तात्काळ आपल्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून याकुब खान याच्यासह अन्सार हसन भिस्ती (वय २३, मूळ रा. शाहूनगर, हल्ली मुक्काम पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि वारिस जैनुल खान (वय ४४, मूळ रा. नॉर्थ मुंब्रा, जिल्हा ठाणे, हल्ली मुक्काम खडका रोड, भुसावळ) या तिघांना बेड्या ठोकल्या.

अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले. पोलीस आता या ड्रग्स तस्करीच्या नेटवर्कमधील इतर सदस्यांचा शोध घेत असून, या तिघांच्या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Protected Content