महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ऑफलाईन घ्या : खंडपिठाकडे मागणी

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदांसाठी १८ मार्च रोजी घेण्यात येणारी निवड प्रक्रिया ही ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन या प्रकारात घेण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या दोन नगरसेवकांनी खंडपिठात याचिका दाखल केली आहे.

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवड १८ मार्च रोजी होत असून याआधीच भाजपमध्ये फूट पडलेली आहे. दरम्यान, ही निवड प्रक्रिया ऑनलाईन या प्रकारात होत असल्याने भाजपने याला विरोध दर्शविला आहे. या अनुषंगाने डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.

भाजपच्या दोन्ही नगरसेवकांनी अ‍ॅड. अमरजीतसिंग गिरासे यांच्यामार्फत विभागीय आयूक्त व मनपा आयुक्तांच्या ऑनलाईन निवडणुकीच्या घोषणेला आव्हान दिले. अलीकडेच पिंपरी चिंचवड आणि नागपूर महापालिकेत प्रत्यक्ष अर्थात ऑफलाईन बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडणूक घेण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन या प्रकारात घेण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे.

डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांच्यावतीने अ‍ॅड. अमरजीतसिंह गिरासे, अ‍ॅड. योगेश बोलकर, अ‍ॅड ज्ञानेश्‍वर बागुल व अ‍ॅड. विष्णू मदन पाटील काम पाहत आहेत. या प्रकरणी न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्या समोर सुनावणी होणार आहे. यात न्यायालय नेमका काय निकाल देणार याकडे आता जळगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Protected Content