जळगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची भिंत संरक्षक भिंत प्रशासनाने पाडल्याच्या निषेधार्थ आज (दि.१०) पासून व्यापारी व आडत संघटनांनी बेमुदत बंदचे आयोजन केले आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट दिसून आला. सकाळपासूनच सगळे व्यवहार ठप्प होते, त्यामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाजार समिती प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी समितीच्या आवाराची ही भिंत नव्या कॉम्पलेक्सच्या विकासासाठी रस्ता बनवण्याला जागा व्हावी म्हणून पाडली. ही भिंत पाडल्याने व्यापाऱ्यांचा कोट्यवधींचा माल उघड्यावर पडला असून तो चोरीला जाण्याची अथवा गुरा-ढोरांनी खराब करण्याची भीती निर्माण झाली आहे. असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. दरम्यान हे कॉम्पलेक्सचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे काम केले जात असल्याचा आरोप येथील आडत असो.चे सचिव सुनील तापडिया यांनी केला आहे. तर संचालक किशोर करवा यांनी येथे ९० टक्के माल शेतकऱ्यांचा असून तो उघड्यावर पडल्याने चोरीला जाण्याची अथवा खराब होण्याची भीती असल्याचे म्हटले आहे.