जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल रात्री झालेल्या गोळीबाराने प्रचंड खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कसा झाला ? यात कोण सहभागी होते ? आणि त्यांनी उपमहापौरांना कसे धमकावले ? याची विस्तृत माहिती पोलीस स्थानकात दाखल केलेल्या फिर्यादीत दिली आहे. या फिर्यादीनुसार काल रात्री घडलेला थरार जसाचा तसा आपल्याला सादर करत आहोत.
याबाबत वृत्त असे की, काल रात्री पावणेदहाच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर इनोव्हातून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला. यात सुदैवाने त्यांना काही झाले नसले तरी यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कुलभूषण पाटील यांनी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत काल घडलेल्या प्रकाराचा थरार नमूद केलेला आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि.२५/०७/२०२१ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नितीन भिमसिंग पाटील, निलेश ठाकुर आणि उमेश पाटील यांच्यात जुन्या भांडणातून वाद झाला होता. यामुळे ते पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेलेले होते. तेव्हा आपल्याला (कुलभूषण पाटील यांना) सदर वादाबाबत फोन आल्याने मी पो.स्टेला जावुन त्यांचा आपसातील वाद मिटविला होता व दोघांमध्ये समझोता घडवून आणला होता. नंतर आम्ही सर्व घरी निघुन गेलो होतो.
यात पुढे नमूद केले आहे की, यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कुलभूषण पाटील यांना बिर्हाडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने म्हटले की, ”तु दुपारी पो.स्टेला समझोता घडवुन आणला व नितीन राजपुत याला माझ्याकडे आणणार होता. आम्ही त्याला सोडणार नाही, त्याला जीवे ठार मारू आणि तू मध्ये पडल्यास तुझाही गेम करू!” असे त्याने धमकावले. यावर कुलभूषण पाटील यांनी त्याला समजावत ”भानगडी करु नका,आपण उद्या भेटु” असे सांगितले असता त्याने उपमहापौरांना फोनवरच शिवीगाळ केली. यामुळे त्यांनी फोन कट केला.
यानंतर थोड्याच वेळात म्हणजे आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी कुलभूषण पाटील यांना पुन्हा फोन आला. यात समोरच्या व्यक्तीने म्हटले की, ”तू कुठे आहे ते आम्हाला माहीती आहे… तू फार मोठा नेता झाला आहे, तुला फार समाज कार्याची पडली आहे. तुला अशा भांडणी मिटविण्यामध्ये मोठे वाटते. आज आम्ही तुझा गेम करु,उद्याचे पेपर मोठे मोठे बातम्यांनी भरलेले असतील परंतु ते वाचायला तू जिवंत राहणार नाही” अशी धमकी देवुन शिवीगाळ केली. यामुळे कुलभूषण पाटील यांनी हा कॉल कट करून आपला फोन बंद करून टाकला.
यानंतर रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास कुलभूषण पाटील हे पिंप्राळा स्टॉप वरुन त्यांचे मित्र अनिल जमनाप्रसाद यादव यांच्या सोबत मोटारसायकलवरून निघाले. पिंप्राळा हुडको रोडवरील जुन्या लाकडाच्या वखार जवळ एक इनोव्हा ग्रे रंगाची कार ही आली. यात असलेल्यांनी ही मोटारसायकल अडवली. इनोव्हा गाडीचे काच खाली करुन गाडीत बसलेले महेंद्र राजपुत, त्याचा भाऊ उमेश राजपुत, मंगल राजपुत आणि बिर्हाडे ( पुर्ण नाव माहीत नाही) यांनी कुलभूषण पाटील यांना धमकावले.
”*** थांब, आज आम्ही तुझा गेम करणार आहे. तुला जीवंत सोडणार नाही” असे म्हणत महेंद्र राजपुत व उमेश राजपुत यांनी गाडीतुन पिस्तुल दाखवत दमबाजी करुन शिवीगाळ केली. यामुळे उपमहापौरांनी अनिल यादव याला आपल्या घराकडे मोटारसायकल नेण्याचे सांगितले. ते वेगाने घराकडे निघाले असतांना इनोव्हात असलेल्यांनी पाठलाग करत आनंद मंगल कॉलनीतल्या हनुमान मंदिराजवळ त्यांच्या दिशेने गोळी झाडली.
उपमहापौर कुलभूषण पाटील आणि अनिल यादव हे वेगाने पाटील यांच्या घराजवळ आले. इनोव्हा गाडी त्यांचा पाठलाग करत आली. याप्रसंगी घराजवळ उपमहापौरांचे आई-वडील आणि अन्य सदस्य घराबाहेर बसलेले होते. कुलभूषण पाटील यांनी तातडीने त्यांना घरामध्ये जाण्याचे सांगितले. तेवढ्यात त्यांच्या मागुन इनोव्हा गाडी येवुन त्यातील सर्व जण खाली उतरुन त्यांनी उपमहापौरांना जोर जोरात शिवीगाळ करुन ”आज तुला जिवंत ठेवणार नाही” असे म्हणुन महेंद्र राजपुत याने कुलभूषण पाटील यांच्या दिशेने गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकुन कुलभूषण पाटील यांची पत्नी व मुले हे पहिल्या मजल्यावरील गॅलरीत आले. तेव्हा उमेश राजपुत याने पाटील यांची पत्नी व मुलांच्या दिशेने गोळी झाडली. त्यावेळेस कुलभूषण पाटील यांनी घराच्या वॉलकंपाउंड मागील बाजुस लपुन पत्नी व मुलांना घरात जाण्यास सांगितले. यावेळी हल्लेखोरांनी पुन्हा त्यांच्या दिशेने गोळी झाडली.
याप्रसंगी हल्लेखोरांनी गोळीबाराचा आवाज ऐकून जमा झालेल्या गल्लीमध्ये लोकांना देखील शिवीगाळ करत मध्ये ”कोणी आल्यास आम्ही त्यांना ही मारु” असे धमकावले. त्यानंतर ते त्यांच्या इनोव्हातुन निघुन गेले. यानंतर लागलीच परिसरातील लोक कुलभूषण पाटील यांच्या घरी आले. आणि थोड्याच वेळात रामानंदनगर पोलीस स्थानकाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी कुलभूषण वीरभान पाटील यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार महेंद्र राजपुत; उमेश राजपुत; मंगल राजपुत आणि बिर्हाडे ( पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. पिंप्राळा परिसर यांच्या विरूध्द या अनुषंगाने भादंवि कलम-३०७, ३४१, ५०४, ५०६, ५०७; तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावरील गोळीबार झाल्यानंतर लाईव्ह ट्रेंडस न्यूजने परिसरातील घडामोडींना आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी लाईव्ह केले होते. खालील पाच व्हिडीओजमधून आपण याचे तपशील जाणून घेऊ शकतात.
व्हिडीओ क्रमांक १ : गोळीबारानंतर कुलभूषण पाटील यांच्या घराजवळचा ऑन-द-स्पॉट रिपोर्ट
https://www.facebook.com/508992935887325/videos/215532393689310
व्हिडीओ क्रमांक २ : अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिलेली भेट
https://www.facebook.com/508992935887325/videos/408043913967525
व्हिडीओ क्रमांक ३ : गोळीबाराचे प्रत्यक्षदर्शी अनिल यादव व पंकज पाटील यांनी दिलेली माहिती
https://www.facebook.com/508992935887325/videos/4306405372752154
व्हिडीओ क्रमांक ४ : जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेली भेट
https://www.facebook.com/508992935887325/videos/228317439150168
व्हिडीओ क्रमांक ५ : गोळीबाराबाबत डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया
https://www.facebook.com/508992935887325/videos/365615828246861