जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटची सभा २५ रोजी होणार असून नवीन कुलगुरूंच्या उपस्थितीतील या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटची सभा २५ मार्चला घेण्यात येणार आहे. या सभेत विद्यापीठाचा अर्थसंकल्पही मांडला जाणार आहे; मात्र ही सभा कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे ऑफलाईन घ्यायची की ऑनलाईन याबाबत निर्णय झालेला नाही. प्र. कुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांची भेट घेत सभेसाठी परवानगीचा प्रस्ताव सादर केला. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
मार्च अखेर विद्यापीठाचा अर्थसंकल्प सिनेट सभागृहात सादर करून त्यास मान्यता घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने २५ मार्चला या सभेचे आयोजन केले होते; मात्र जिल्हा प्रशासनाने सर्व क्षेत्रातील सभा, बैठकांवर निर्बंध आणल्याने सभा घेण्याबाबत विद्यापीठ प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. यातून आता लवकरच मार्ग निघण्याची शक्यता आहे. तर, ई. वायूनंदन यांच्या उपस्थितीत ही पहिलीच सिनेट सभा होणार असल्याने याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.