..अखेर जिल्हा बँकेची तहकूब सभा लागली मार्गी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा बँकेत नाट्यमय पध्दतीत सत्तांतर झाल्यानंतर तहकूब झालेली सभा आज विरोधकांच्या उपस्थितीमुळे घेण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात जिल्हा बँक चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी ऐन वेळेस चेअरमनपदासाठी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली. यामुळे अध्यक्षपदासाठी संजय पवार आणि रवींद्रभैय्या पाटील यांच्यात लढत झाली. यात पवार यांनी एक मताने बाजी मारून सत्ता संपादन केली. तर अमोल चिमणराव पाटील हे उपाध्यक्षपदी बिनविरोध विराजमान झाले.

संजय पवार यांच्या निर्णयाचा राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. यामुळे जिल्हा बँकेत सत्तांतर झाल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी अतिशय कडक शब्दांमध्ये त्यांच्यावर टिका केली होती. तर पवार यांनी देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यानंतर गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेची सभा आयोजीत करण्यात आली. या सभेला विरोधी पक्षाचे सदस्य उपस्थित राहिले नाही. परिणामी कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करावी लागली. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने इतर संचालकांना फोन कॉल केल्यामुळे विरोधक उपस्थित राहिले नाहीत असा आरोप संजय पवार यांनी केला होता.

दरम्यान, हीच तहकूब झालेली सभा आज दुपारी दोन वाजता आयोजीत करण्यात आली. या सभेला विरोधी सदस्य उपस्थित राहतील की नाही ? याबाबत संशंकल्लोळ निर्माण झाला होता. तथापि, स्वत: आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह माजी अध्यक्ष गुलाबराव देवकर, अनिल भाईदास पाटील, रोहिणी खडसे आदींसह अन्य संचालक बँकेच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने नवीन चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या उपस्थितीत पहिली सभा मार्गी लागली आहे.

Protected Content