जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आले असून आता माघारीत अनेक प्रकारच्या वाटाघाटी सुरू आहेत. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र ही निवडणूक होते तरी कशी ? हा प्रश्न अनेकांना समजत नाही. यासाठी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी ही प्रक्रिया सहजसोप्या पध्दतीत समजावून सांगितली आहे. आपण यातून जेडीसीसी बँकेच्या निवडणूक प्रणालीची माहिती जाणून घेऊ शकतात.
डॉ. नि. तु. पाटील यांनी सोशल मीडियात शेअर केलेल्या पोस्टमध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नेमकी कशी होते ? याची माहिती दिलेली आहे. पहा ही पोस्ट जशीच्या तशी.
बिनविरोध करू,आघाडी करु, स्वतंत्र लढू,किमान वाटाघाटी करू,कार्यकर्ते यांना विचारात घेऊन चर्चा करू… आदी आदी प्रश्नांचा भडिमार नक्कीच तुम्हाला पण झाला असेल….!पण नुकतेच सर्वांनी आवेदन पत्र भरले आणि एकदाचे राम म्हटले…!पण मला जो प्रश्न सतावतो आहे,किंबहुना बहुतेक लोकांनी सुद्धा मला हाच प्रश्न विचारला,या निवडणुकीला कोण मतदान करतो?
तर त्याविषयी आज विस्तृत माहिती देत आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात आपली दगडी बँक अर्थात जेडीसीसी बँकेत एकूण २१ संचालक असून त्यांच्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील प्रत्येकी १ जण असे १५ जण यांना त्या त्या तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था/सोसायटी मतदार संघ यातील सभासद ठराव करून एका व्यक्तीला मतदान करण्याचा/उभे राहण्याचा अधिकार देतात.
उदाहरणार्थ, भुसावळ तालुक्यातील एकूण २७ विविध सोसायटी,त्यातील २ सोसायटी मध्ये प्रशासक आहे,त्यामुळे फक्त २५ सोसायटी म्हणजे २५ मते…! परिणामी भुसावळ तालुक्यातील एकाला २५ जण मतदान करतील.
यानुसार जेडीसीसी बँकेतील २१ पैकी १५ सदस्यांची निवडणूक होत असते. आता उरतात ६ संचालक !
या सहापैकी पाच जागा या राखीव असतात. यातील दोन महिला, एक ओबीसी, एक एनटी आणि एक एससी/एसटी असे आरक्षण प्रदान करण्यात आलेले आहे. तर उर्वरित एक जागा ही इतर संस्था आणि वैयक्तीक शेअर धारकांमधून निवडून येत असते.
आता पाच राखीव जागांसाठी मतदान नेमके कोण करणार ते पाहूया- यात ,विविध कार्यकारी सोसायटी,विविध पतसंस्था, अर्बन बँक,दूध डेअरी,फ्रुट सेल,कॉटन सेल, शेतकी संघ,हौसिंग,गृहनिर्माण, ग्राहक संस्था, मजूर संघटना आदी,परत ठराव करून एकाला असा अधिकार देतात…!
परिणामी जळगाव जिल्ह्यात असे एकूण २८०० मतदार असून ते या ५ राखीव जागांसाठी मतदान करतील. लक्षात घ्या,५ जागांसाठी मतदारसंघ हा संपूर्ण जळगाव जिल्हा…!
आता, उरलेल्या एका जागेबाबत माहिती घेऊ- यात १ सभासद,हा वैयक्तिक शेअर धारक यांमधील आणि वरील संघटना (विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था/सोसायटी सोडून)मधून निवडला जातो,जळगाव जिल्ह्यात असे २००० मतदार आहेत,यांचा पण मतदारसंघ हा संपूर्ण जळगाव जिल्हा राहणार आहे.
थोडक्यात, सांगायचे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जळगाव जिल्ह्यातील २१ संचालक निवडून येणार आहेत.
यातील १५ जागांसाठी संबंधीत प्रत्येक तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे ठरावधारक मतदान करतील.
पाच राखीव जागांसाठी जिल्ह्यातील २८०० मतदार मतदान करतील.
एक वैयक्तिक जागेसाठी जिल्ह्यातील दोन हजार मतदार मतदान करतील.
अशी विभागणी करण्यात आलेली आहे.मित्रांनो,आता आपल्या लक्षात आले असेल,असं गृहीत धरतो.
टिप : काही काही ठिकाणी एकच व्यक्तीला २ ठिकाणी ठरावात अनुमोदन मिळाले तर तो व्यक्ती २वेळा मतदान करतो.तसेच ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सोसायटी यांचा ऑडीट अहवाल हा वर्ग, अफ अथवा ब असेल तरच त्यांना उमेदवार देण्याचा अधिकार असतो.आता, जळगाव जिल्ह्यात २१ पैकी ३ जागा तर बिनविरोध झाल्या आहेत,त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन…!आता,लढाई ही १८ जागांसाठी…!
मित्रांनो, १०० वर्षाचा इतिहास असलेली ही बँक जळगाव जिल्हा मधील गरजू,उपेक्षित,शेतकरी वर्गाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून यात सर्वसामान्य शेतकरी वर्गाला प्रतिनिधित्व करायला मिळत नाही,हे नक्कीच दुर्दैवी आहे.(या बद्द्ल विस्तृत माहिती मी इंटरनेट वर शोधली पण काहीही उपयोग झाला नाही,तेव्हा माधव काका पाटील यांच्याशी संपर्क करून ही माहिती घेतली.)
डॉ. नि. तु.पाटील
उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक ,वैद्यकीय आघाडी,
भारतीय जनता पार्टी , मोबाईल क्रमांक : ८०५५५९५९९९