


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनी येथे घडलेली ३१ लाख २६ हजार ८०० रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोठी घरफोडी अवघ्या २४ तासांच्या आत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून संपूर्ण चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी संगीता और घुगे या आपल्या कुटुंबासह मध्य प्रदेशातील उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री ३:३० वाजेपासून २८ ऑगस्ट रोजी रात्री ३:३० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने लांबवले. घरमालक परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तत्काळ तपासाचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वात एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यावरून संशयित आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २७, दोघे रा. सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
संशयितांची कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. आरोपींकडून तब्बल २०८ ग्रॅम सोन्याचे विविध दागिने (ज्यात गंठन, पाटल्या, विविध डिझाईनच्या अंगठ्या, नथ, टॉप्स यांचा समावेश आहे) आणि २८ ग्रॅम चांदीचे जोडवे असा एकूण ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पीएसआय विजयसिंग पाटील, हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, तसेच अंमलदार रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घंटे, गणेश टेकर, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे, विशाल कोळी, योगी घुगे व सुभाष साबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



