जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकरी संवेदना अभियानाच्या अंतर्गत बळीराजासाठी झपाटून काम करणार्या भरारी फाऊंडेशनला पुखराजजी पगारिया यांनी पॉवर विडर उपकरणाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे.
दीपक परदेशी यांच्या भरारी फाऊंडेशनने शेतकरी संवेदना अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी अतिशय भरीव असे काम केले आहे. याच्या अंगर्तत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातच गरीब व अल्पभूधारक शेतकर्यांसाठी कृषि अवजार बँक तयार केली आहे. यातील उपकरणे ही गरजू शेतकर्यांना मोफत वापरण्यासाठी देण्यात येत आहेत.
भरारी फाऊंडेशनच्या या अथक प्रयत्नांना अनेक मान्यवरांनी मदतीचा हात दिला आहे. यात जिल्ह्यातील नामवंत व्यावसायिक/उद्योजक तथा दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे पुखराजजी पगारिया यांनी पॉवर वीडर हे सुमारे ७० हजार रूपये किंमत असणारे उपकरण भेट म्हणून दिले आहे. शेतातील तण यांत्रीक पध्दतीत काढण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. सर्वसामान्य गरीब शेतकरी याचा वापर करण्याचे स्वप्न देखील पाहू शकत नसतांना आता भरारीच्या माध्यमातून ते याचा मोफत वापर करू शकणार आहे.
पुखराजजी पगारिया यांनी हे उपकरण भरारी फाऊंडेशनचे संस्थापक दीपक परदेशी यांना सुपुर्द केले. याप्रसंगी, कृषि उपसंचालक अनिल भोकरे व प्रोजेक्ट कन्सल्टंट समाधान पाटील उपस्थित होते.