महिलेचा पाठलाग करत भामट्यांनी लांबविली सोनसाखळी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील रामानंदनगर येथे महिलेच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची चेन अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येऊन जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना रात्री घडली.

बाबत अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील या काल म्हणजेच शुक्रवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजता आपल्या दुचाकीने रामानंदनगर परिसरातून जात होत्या. इतक्यात त्यांच्या पाठीमागून दुचाकीने आलेल्या दोन भामट्यांनी पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबविली.

या झटापटीत सोनसाखळीमध्ये असलेले सोन्याचे पेंडल हे खाली पडले. दरम्यान चोरट्यांनी पेंडल सोडून सोन्याची चेन घेऊन दुचाकीने गिरणा टाकीकडे पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर वंदना पाटील यांनी तात्काळ रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content