जळगावात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले असून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक, महाड आणि पुणे येथे राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या पाठोपाठ आता जळगावातील शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणे यांना तातडीने अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

याप्रसंगी महापौर जयश्री सुनील महाजन, गजानन मालपुरे, महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई चौधरी, सरीता माळी-कोल्हे, विराज कावडिया, अनंत जोशी, प्रशांत सुरळकर, प्रा. अस्मिता पाटील आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहर पोलीस स्थानकात जाण्याआधी पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, संपूर्ण देशभरातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचा गौरव होत असतांना नारायण राणे यांचे वक्तव्य हे अतिशय निषेधार्ह असेच आहे. तर गजानन मालपुरे यांनी भारतीय जनता पक्ष कथितरित्या नैतिकतेचे पालन करणारा असल्याचा टेंभा मिरवत असूनही या प्रकारची वक्तव्ये हे दुर्दैवी असल्याचे सांगितले.आज महिलांच्या विरोधात बोलणारे सर्वाधीक नेते हे भाजपमध्येच आहेत. जर भाजपला नैतिकतेची चाड असेल तर त्यांनी राणेंना तात्काळ मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी देखील मालपुरे यांनी केले.आपण राणे यांच्या विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करत असल्याची माहिती गजानन मालपुरे यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content