जळगाव प्रतिनिधी | शहरातील तांबापुराजवळच्या वखारीजवळ दोन अर्भक मृतावस्थेत सापडल्याच्या वृत्ताने काही काळ खळबळ उडाली. मात्र पोलिसांच्या तपासणीत ते प्लास्टीकचे असल्याचे आढळून आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
याबाबत वृत्त असे की, शहरातील तांबापुरा येथे असणार्या वखारीजवळ आज सायंकाळी दोन अर्भक मृतावस्थेत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली. काही क्षणातच येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला. मात्र जाणकरांनी प्रथमदर्शनीच हे मृत अर्भक प्लास्टीक वा रबराचे असल्याचा संशय व्यक्त केला. तर बर्याच जणांना हे अर्भक खरे वाटत होते. अखेर एमआयडीसी पोलीस स्थानकाचे निरिक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळ गाठून प्रत्यक्षात याची तपासणी केली असता हे दोन्ही अर्भक प्लास्टीकचे असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी तपास केला असता एका भंगार व्यावसायिकाने एका मुलाला हे दोन्ही प्लास्टीकचे अर्भक फेकून देण्यासाठी पाठविले होते. मात्र हे खरे अर्भक असल्याची अफवा पसरल्याने त्याने स्वत: पोलिसांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, या प्रकारामुळे मात्र काही तासांपर्यंत जळगाव शहरात मृत अर्भके आढळून आल्याची अफवा पसरली होती. सायंकाळीच लाईव्ह ट्रेंडस न्यूजला या संदर्भातील फोन आला होता. मात्र शहानिशा केली असता ही बाब संशयास्पद असल्याचे लक्षात आल्याने आम्ही हे वृत्त दिले नाही. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांनी हा फेक प्रकार असल्याचे उघड केले.