जळगाव प्रतिनधी | सापांसोबत स्टंट करणे हे त्याला हाताळणारा व्यक्ती व सापांसाठीही घातक आहेच. याचसोबत हा गुन्हा देखील असून कुणी असे करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा येथील वन्यजीव संरक्षण संस्थेने दिला आहे.
सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी साप निघत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळा सर्पमित्रांमुळे सापांना न घाबरता वा त्यांना न मारता सुरक्षितपणे पकडून दुसरीकडे सोडून दिले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. यातच अलीकडे नागरीकांनी सापांसोबत खेळ करणे, त्यांना दुखापत करणे अशा घटनांचे चित्रण करुन सोशल मीडियावर ते व्हायरल केल्याचे प्रकार देखील वाढीस लागल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत वन्यजीव संरक्षण संस्था व मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक व वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांनी यांनी असले प्रकार होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.
भडगाव परिसरातील एक तरुण साप हाताळण्याचे अनुकरण करताना कोब्रा दंशाने अत्यवस्थ झाला. तर जामनेर तालुक्यात एका तरुणाने सापास जमिनीवर आपटून ठार मारल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनांना आवर घालण्यात यावे यासाठीचे प्रयत्न आता केले जात आहेत. या पुढे जे लोक साप मारतील, सापांसोबत स्टंट करतील व त्यांचे कोणत्याही प्रकारे फोटो किंवा व्हिडीओ प्रसारित करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे इशारा देण्यात आला आहे.