जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यास लसींचा साठा प्राप्त झाला असून उद्या अर्थात सोमवारी मर्यादीत प्रमाणात लसीकरण होणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग सातत्याने कमी-जास्त होत आहे. लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने याच्या वाटपाचे नियोजन करण्यात देखील अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, आज दुपारी जिल्ह्यात लसींचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे उद्या सोमवार दिनांक २४ मे रोजी जिल्हाभरातील १८५ लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. यात कोविशिल्डच्या लसींचा साठा मिळाला असून ४५ वर्षांवरील व्यक्तींना पहिल्या डोससाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
जळगाव शहराचा विचार केला असता छत्रपती शाहू महाराज रूग्णालय, डी. बी. जैन हॉस्पीटल, शिवाजीनगर आणि शाहीर अमर शेख हॉस्पीटल, कुंभार वाडा या तीन ठिकाणी सोमवारी लसीकरण सुरू राहणार आहे. तर जिल्ह्यात उपलब्धतेनुसार ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पहिल्या डोससाठी लसीकरण होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.