जळगाव प्रतिनिधी । सलग दोन दिवसांच्या विरामानंतर जिल्हा प्रशासनास कोविडच्या लसींचा साठा प्राप्त झाला असल्याने जळगाव शहरासह तालुक्यांमध्ये गुरूवारी लसीकरण करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनास पुरेसा लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने दोन दिवसांपर्यंत जळगाव शहरातील लसीकरण बंद होते. तर जिल्ह्यातही मर्यादीत प्रमाणात लसीकरण झाले होते. दरम्यान, आज या स्थितीत थोडा बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आज जिल्ह्यासाठी कोविशील्डचे साडेचार हजार व कोव्हॅक्सीनचे २ हजार ३००वर असे डोस प्राप्त झाल्यानंतर गुरुवारपासून ठरावीक केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे.
लसींचे डोस प्राप्त झाल्यामुळे जळगाव शहरातील ८ केंद्रांवर गुरुवारी लसीकरण करण्यात येईल. यात शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगरातील डी.बी. जैन, नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, मास्टर कॉलनीतील मुलतानी हॉस्पिटल, कुंभारवाड्यातील शाहीर अमर शेख व सिंधी कॉलनीतील चेतनदास हॉस्पिटल येथे कोविशील्डची लस तर गणपती नगरातील स्वाध्याय भवन व कांताई नेत्रालय येथे कोव्हॅक्सीनची लस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येईल. तसेच या प्रत्येक केंद्रावर दुसर्या डोसला प्राधान्य तसेच लसीच्या उपलब्धतेनुसार हेल्थवर्कर, फ्रंटलाइन वर्कर यांना दुसर्या डोसला प्राधान्य असेल.
जिल्ह्याला काेविशील्डचे ४७००, तर काेव्हॅक्सिनचे २३०० डाेस मिळाले. यातून शहराला २१०० डाेस मिळाले. उपलब्ध साठ्यातून कोविशील्ड लस ही जळगाव शासकीय ६००, जामनेर ३००, चोपडा ३००, मुक्ताईनगर ३००, चाळीसगाव ३००, अमळनेर ३००, पाचोरा ३००, धरणगाव ३००, जळगाव महापालिका २०००, सावदा ४०, तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र १०० डोस देण्यात आले. तर कोव्हॅक्सिनचे डोस अनुक्रमे जामनेर १००, चाळीसगाव १००, पारोळा ३०, यावल १००, भडगाव १००, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल १००, भुसावळ नगरपालिका २००, जळगाव महापालिका ९००, पाल १००, पिंपळगाव १००, पहूर १००, झामी चौक अमळनेर ५०, न्हावी १००, सावदा १५०, वरणगाव १०० असे वाटप झाले.