लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर; जळगावात लसीकरण बंद

जळगाव प्रतिनिधी । लसींचा नवीन साठा येत नसून आता जिल्ह्यातील साठा संपण्याच्या मार्गावर आहे. याचमुळे जळगावात आज लसीकरण बंद राहणार आहे.

प्रशासनाने लसीकरणासाठी नियोजन केले असले तरी राज्य सरकारकडून साठाच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. गेल्या चार दिवसांपासून लसींचा नवीन साठा आलेला नाही. परिणामी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसींचे डोस संपण्याच्या मार्गावर आहेत. शहरातील २०० सह जिल्ह्यात अवघे ८३० डोस शिल्लक आहेत. यात ५८० कोविशील्ड तर २५० कोव्हॅक्सिन लसीचे डोस आहेत. याचमुळे आज शहरातील महापालिकेच्या एकाही केंद्रावर लस टोचली जाणार नसल्याचे कळवण्यात आले आहे.

तर, जिल्ह्यात जिथेही लस उपलब्ध आहे तिथे लसीकरण होणार आहे. तथापि, सर्व केंद्रांवर मुळातच लसींचा मर्यादीत साठा उपलब्ध असल्याने आज अतिशय मर्यादीत प्रमाणात लसीकरण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content