Home आरोग्य जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रूग्ण : आरोग्य यंत्रणा सतर्क

जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रूग्ण : आरोग्य यंत्रणा सतर्क

0
33

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या ओसरणीला लागल्याचे दिसून येत असले तरी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगावातील सात रूग्णांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस हा घातक व्हेरियंट आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची रूग्णसंख्या आता मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. रूग्णांची संख्या आणि मृत्यू दर यात विलक्षण घट आलेली आहे. तर रिकव्हरी दर हा खूप जास्त प्रमाणात आहे. तथापि, कोविडची तिसरी लाट गृहीत धरून प्रशासन सतर्क आहे. यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सायंकाळी दिलेली माहिती ही थोडी चिंता वाढविणारी ठरली आहे.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत.

या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लग्न झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासितांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट समोर येत आहेत. यात अलीकडच्या काळात डेल्टा आणि डेल्टा प्लस हे दोन व्हेरियंट समोर आले असून ते अतिशय घातक मानले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील रूग्णांमध्ये हे व्हेरियंट आढळल्याने आता आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.


Protected Content

Play sound