जळगाव प्रतिनिधी | शिवसैनिकांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्यानंतर पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही वाघाची औलाद होती, तर कोंबड्या का आणल्यात ? असा प्रश्न उपस्थित करून आपण या प्रकरणी गुन्हा नोंदविणार असल्याचा इशारा दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले असून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक, महाड आणि पुणे येथे राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या पाठोपाठ आता जळगावातील शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृती या कार्यालयावर घोषणाबाजी करून धडक दिली. कार्यालयात शिवसैनिकांनी कोंबड्या सोडून नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यात भाजप कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली. तर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या बाहेरच जोरदार घोषणाबाजी केली. येथे नारायण राणे यांच्या प्रतिमेला चपलांचा मार देण्यात आला.
दरम्यान, या सर्व प्रकारावर भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राजकारणात विचारांचे वाद असतात. एकमेकांवर टीका केली जाते. मात्र धुडगुस घालणे, दगडफेक करणे असे कुणी करत नाही. तथापि, शिवसेनेने आज हा सर्व प्रकार केला. विशेष म्हणजे महिलांना पुढे करून शिवसैनिकांनी हा प्रकार केला असून त्यांनी बांगड्या घातल्या होत्या का ? जर ते वाघाची औलाद म्हणवतात तर त्यांनी येथे वाघ आणले पाहिजे होते….कोंबड्या का आणल्या ? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दीपक सूर्यवंशी पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कार्यालयीन मंत्री प्रकाश पंडित हे असतात. त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. यामुळे आपण पोलीस स्थानकात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी आपण महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांच्या विरूध्द तक्रार करणार असल्याचेही दीपक सूर्यवंशी म्हणाले.
खालील व्हिडीओत पहा दीपक सूर्यवंशी नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/176562104566648