जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रूग्णवाहिकेने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना नशिराबाद शहराजवळ घडली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, एमएच १४ सीएल ०८०१ या क्रमांकाची रूग्णवाहिका भुसावळ येथून रूग्णाला घेऊन जळगावकडे येत होती. दरम्यान, नशिराबादच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावर एमपी ०९ एक्सएफ ७२२२ या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रोशन कुमार हा जबर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक अपघातस्थळी धावले. त्यांनी रोशन कुमार याला उपचारासाठी दाखल करण्याची तयारी सुरू केली असतांनाच त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात नशिराबाद पोलीस स्थानकात रात्री उशीरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मयत रोशन कुमार हा बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.