जळगाव सायबर पोलिसांची मोठी कामगिरी; 12 लाख 50 हजारांचे 62 गहाळ मोबाईल हस्तगत


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सायबर पोलिसांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठांमधून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन तब्बल 12 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 62 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. या सर्व मोबाईलचा त्यांच्या मालकांकडे परतावा करण्याची प्रक्रिया आज जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते पार पडली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेसाठी पोलिस निरीक्षक सतिष गोराडे आणि पोलिस उपनिरीक्षक गणेश अहीरे यांना विशेष आदेश देण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलिस स्टेशन, जळगाव येथील पोहेकॉ किरण वानखेडे, हेमंत महाडीक, पोना सचिन सोनवणे, पोकॉ पंकज वराडे, गौरव पाटील, मिलींद जाधव आणि दिपक पाटील या अधिकाऱ्यांनी कार्यरत पथक तयार केले.

या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये जाऊन गहाळ मोबाईलचा शोध घेतला. तांत्रिक तपास, सीआयडी नेटवर्क आणि आयएमईआय क्रमांकाच्या आधारे शोध घेण्यात आला. अखेरीस एकूण 62 मोबाईल हाती लागले असून, त्यांची एकत्रित किंमत सुमारे 12 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. या सर्व मोबाईलचा परतावा कार्यक्रम आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडला.

सदर हस्तगत मोबाईलचे आयएमईआय क्रमांकासह संपूर्ण तपशील जळगाव पोलिसांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे. नागरिकांना स्वतःचा हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टल (Central Equipment Identity Register) वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

सायबर पोलिसांची ही यशस्वी मोहीम नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील डिजिटल सुरक्षेप्रती प्रशासन किती कटिबद्ध आहे, याचे प्रतिक मानले जात आहे. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.