जळगाव प्रतिनिधी | शहरातील रामदास कॉलनीतली संरक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी अभियंत्याला निलंबीत करण्यात आले असले तरी कंत्राटदारावर मात्र तूर्तास कारवाई करण्यात आलेली नाही.
रामदास कॉलनीच्या ओपन स्पेसला लागून असलेल्या नाल्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम अलीकडेच झाले होते. या नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र काम पूर्ण होऊन पंधरा दिवस होत नाही तोच ही भिंत कोसळल्यामुळे खळबळ उडाली होती.
या प्रकरणात शहर अभियंता यांनी संबंधित अभियंता मिलिंद जगताप व मक्तेदार यश बिल्डर्स यांना नोटीस बजावली होती. त्यात खुलासा प्राप्त झाल्यानंतर अभियंता यांनी कामावर लक्ष न दिल्याने त्यांच्यावर ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात अभियंत्यावर कारवाई करण्यात आली असली तरी तूर्तास कंत्राटदारावर कारवाई न करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.