”आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे द्यायचे का ?” : बिर्याणी मागणार्‍या पोलीस अधिकारी वादात !

पुणे | ”आपल्या हद्दीत असणार्‍या हॉटेलमध्ये पैसे द्यायचे का ?” असा प्रश्‍न विचारत चकटफू मटन बिर्याणी आणि प्रॉन्सची मागणी करणार्‍या पुण्यातील महिला पोलीस अधिकारी वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. आपल्या पतीसह स्वत:ला चविष्ट नॉन-व्हेज डिशेशची मागणी करतांनाचा त्यांचा ऑडिओ व्हायरल झाला असून या लाचखोरीवर सोशल मीडियातून टीका करण्यात येत आहे.

पुण्यातील झोन एकचा डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे. मात्र, डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता त्यांना गोत्यात आणणारी ठरली आहे. त्यांनी आपल्या सहकारी कर्मचार्‍याला कॉल करून आपले पती आणि स्वत:साठी हॉटेलमधून खाद्यपदार्थ मागविण्याची फर्माईश केली.

यात संबंधीत महिला पोलीस अधिकारी मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचार्‍याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ त्यांना साजूक तुपातील हवे आहेत. जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असेही त्या बजावत आहेत. तसेच कर्मचार्‍याने विचारले नसतांनाही त्यांनी या खाद्य पदार्थांसाठी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतो. एवढेच नव्हे तर या डिशेश देखील मॅनेज करण्याचे तो सांगत असल्याचे ऑडिओ क्लिपमधून ऐकू येत आहे. शेवटी चिकन बिर्याणी, प्रॉन्स, मटन नल्ली अशी ऑर्डर या मॅडम फायनल करत असल्याचे या कॉलमध्ये ऐकू येते. दरम्यान, ही ऑडिओ क्लीप आता सोशल मीडियात व्हायरल झाली असून या खाऊगिरी करणार्‍या पोलीस अधिकारी वादात सापडल्या आहेत. यावर आता काही कारवाई होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content