जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आधी दणका दिल्यानंतर गलीतगात्र झालेल्या भाजपला शिवसेनेने आज पुन्हा हादरा देत महापालिकेवरील आपली पकड घट्ट केली आहे.
याबाबत वृत्त असे की, तीन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आज महापालिकेतील तीन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधले. यात नगरसेविका सौ. शोभाताई दिनकर बारी व शेख हसीना बी शेख शरीफ तर नगरसेवक सुरेश माणिक सोनवणे या भाजपच्या तीन सदस्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधून या तिन्ही सदस्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
अलीकडेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतर आज दुपारी काही नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. तर सायंकाळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तीन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश घेत असल्याची माहिती दिली. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने त्यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.