आधी महिला पॉझिटीव्ह…नंतर म्हणे निगेटीव्ह…आणि आज मृत्यू ! ( Video )

जळगाव प्रतिनिधी । प्रशासकीय भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे समोर येत असतांना आज एका प्रकरणाने पुन्हा खळबळ उडाली आहे. यात एका महिलेला खासगी रूग्णालयाने पॉझिटीव्ह सांगितले. शासकीय रूग्णालयाने निगेटीव्ह असल्याचे सांगून ग्लुकोजचे पाणी पिण्याचा सल्ला देत घरी पाठवले. तर, याच महिलेचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, कुसुंबा येथील एका महिलेस त्रास जाणवू लागल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथील उपचाराने बरे न वाटल्याने ओम क्रिटीकल केअर या खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे अँटीजन या प्रकारात चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली. यामुळे संबंधीत महिलेस जिल्हा कोविड रूग्णालयात हलविण्यात यावे असे संबंधीत हॉस्पीटलने सुचविले.

या सूचनेनुसार त्या महिला रूग्णाला दुसर्‍या दिवशी अर्थात ११ सप्टेंबर रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. त्याप्रसंगी वैद्यकीय अधिकार्‍यांनी ही महिला कोरोना निगेटीव्ह असल्याचे सांगून त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर या महिलेस फक्त घशाचे इन्फेक्शन झाले असून ते ग्लुकोजच्या पाण्याने बरे होईल असे देखील सांगण्यात आले. दरम्यान, आज सकाळी या महिलेला श्‍वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात दाखल करण्यात आले. यावेळी संबंधीतांनी ही महिला कोरोना पॉझिटीव्ह होती. मात्र जागा नसल्याने तुम्हाला घरी पाठविण्यात आल्याचे सांगितले तेव्हा तिच्या आप्तांचा संताप अनावर झाला. दरम्यान, या महिलेवर उपचार सुरू असतांना आज सकाळी तिचा मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे आधी ही महिला निगेटीव्ह असल्याचे सांगणार्‍या डॉक्टर्सनी ती रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे आज मान्य केले.

ही महिला कोरोना पॉझिटीव्ह असतांनाही तिला वैद्यकीय अधिकार्‍यांनी निगेटीव्ह असल्याचे का सांगितले ? तिला फक्त ग्लुकोज पाणी देण्याचे का सांगण्यात आले ? जागा खाली नव्हती तर तसे सांगितले असते तर तिला दुसर्‍या खासगी रूग्णालयात दाखल केले असते असे तिच्या आप्तांचे म्हणणे आहे. तथापि, असे न करता, डॉक्टर्सच्या बेपर्वाईने एका महिलेचा बळी गेला असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्या महिलेचा मुलगा माधव खरोटे यांनी केली आहे.

खालील व्हिडीओत पहा या धक्कादायक घटनेचा तपशील.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/637675517175709

Protected Content