अजून नवीन खासगी हॉस्पीटल्सला मिळणार परवानगी

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहून आता काही नवीन खासगी रूग्णालयांना परवानगी मिळणार असून याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यायालयात यावर उपचार उपलब्ध होते. यानंतर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलला परवानगी मिळाली. तर नंतर अन्य काही खासगी हॉस्पीटल्समध्ये कोरोनावरील उपचार उपलब्ध करण्यात आले.

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह शहरात गोदावरी, इकरा या डीसीएचसी सेंटरमध्ये कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहे. मात्र याठिकाणी असणारे बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. यासाठी काही फेब्रुवारी महिन्यापर्यंत ५४ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र मार्च महिन्यात कोरोनाची नवीन लाट आल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला सुरवात झाली. खासगी रुग्णालये देखील पूर्ण भरल्याने जिल्हा आरोग्य विभागाने महिन्याभरात नव्याने ५७ रुग्णालयांना परवानगी दिली आहे. यासोबत आणखी काही रुग्णालयांना परवानगी देण्याचे काम सुरु आहे.

महिन्याभरात जिल्ह्यात ५७ खासगी रुग्णालयांना नव्याने परवानगी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १११ रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून याठिकाणी ३ हजार ३०८ बेड आहेत. लवकरच मोहाडी रोडवर उभारण्यात येणार्‍या महिलांच्या हॉस्पीटलमध्येही कोरोनावर उपचार करण्यात येणार असून याची वेगाने तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Protected Content