जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला असतांना तीन तज्ज्ञांचे केंद्रीय पथक दाखल झाले असून त्यांच्याकडून उपचारांबाबत नवीन दिशानिर्देश मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
देशात कोरोनाचा जास्त प्रमाणात संसर्ग असणार्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथकांना पाठविण्यात आले असून या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातही हे तीन सदस्यीय पथक आले असून ते सायंकाळपासून कामाला प्रारंभ करणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
डॉ. चव्हाण म्हणाले की, देशात सर्वाधीक कोरोनाचा संसर्ग असणार्या ५० जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथक पाहणी करून मार्गदर्शन करत आहेत. यात जळगावचा समावेश असल्याने आज तीन सदस्यांचे केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पथक आज सायंकाळी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतल्यानंतर आपले काम सुरू करणार आहे. साधारणपणे जिल्ह्यात हा चमू चार-ते पाच दिवस राहणार आहे.
सिव्हील सर्जन पुढे म्हणाले की, जिल्ह्यात आजवर कोरोनाच्या आपत्तीमध्ये चौथ्यांदा केंद्रीय पथक दाखल झालेले आहे. हे पथक स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची सखोल पाहणी करणार आहे. यात शहरी आणि ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोन्स, होम आयसोलेशन मधील रूग्ण तसेच उपचार प्रणालींची माहिती जाणून घेणार आहे. यानंतर स्थानिक पातळीवर नेमके कसे उपचार आणि अन्य उपाययोजना हव्यात याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. एका अर्थाने, उपचार पध्दतीसाठी हे दिशा निर्देशांनी युक्त असणारे मार्गदर्शन असेल.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत या पथकाच्या दौर्याबाबतची माहिती केंद्रीय पातळीवर पाठविणार आहे. या अनुषंगाने आज सायंकाळपासून पथक प्रत्यक्ष कामकाज सुरू करणार असल्याचे सिव्हील सर्जन डॉ. एन.एस. चव्हाण म्हणाले.
खालील व्हिडीओ पहा डॉ. एन. एस. चव्हाण नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/768924197329993
हाच व्हिडीओ यु-ट्युब वर देखील उपलब्ध आहे !