जळगाव । माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील कोविड केअर सेंटरमध्ये भेट दिली असता कोरोना बाधीत रूग्णांना वेठीस धरण्यात आल्याचा आरोप एनएसयुआय व काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे.
एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या कोवीड सेंटरला भेट दिली असता कोवीड सेंटरमधील रुग्णांना स्वतः व्यासपीठावरून संबोधताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णांना मात्र स्वतःच्या बेडवरून खाली उतरवुन भाजप पक्षाची जणू काही सभाच घेतली.
रुग्णांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करून चार मजली बेडवरून रुग्णांना खाली उतरवून समोर बसून एक प्रकारची अपमानास्पद वागणूक माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णांना दिली. त्यांच्या या निंदनीय कृतीबद्दल जळगाव जिल्हा एन एस यु आय व काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोवीड सेंटर उभारून माजी मंत्री गिरीश महाजन हे रुग्णांवरति व जामनेर तालुक्यातील नागरिकांवरती एक प्रकारे उपकारच करत आहेत. या प्रकारचं त्यांचं वागणं त्यांच्या कालच्या कृतीमधून संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून आलं. कोरोना बाधित रुग्ण हा आधीच शारीरिक व मानसिक दृष्ट्या खचून गेलेला असतो. अशा रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचं काम हे लोकप्रतिनिधीच असतं. परंतु माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काल कोविंड रुग्णांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत, केवळ आणि केवळ आपल्या भाजप पक्षाचा व स्वतःच्या कामाचा अजेंडा मिरविण्याकरता रुग्णांना थेट भाजप पक्षाचे कार्यकर्ते बनवून व्यासपीठासमोर बसविण्यात आले.
प्रसिद्धीसाठी व चमकोगिरी साठी इतरही पर्याय उपलब्ध असताना कोविंड रुग्णांच्या भावनांशी असे खेळणे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे सोशल मीडिया वरती हे फोटो व्हायरल होत असताना प्रत्येक नागरिकाच्या मनातून एकच वाक्य निघत आहे,
अहो..! गिरीश जी हे आपलं वागणं बरे नव्हे..!
दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांना जास्तीत जास्त सोयीस्कर अशा सुविधा पुरवण्याचे काम असतं. परंतु माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने उभारलेल्या जामनेर येथील कोवीड सेंटरमधील कमी जागेत जास्तीत जास्त रुग्ण समाविष्ट होण्याकरता चार मजली बेडची पद्धत अवलंबली. परंतु कोरोना ग्रस्त रुग्ण हे वयोवृद्ध पुरुष, वयोवृद्ध महिला, लहान मुलं अशा सर्व वर्गातील व्यक्तींचा त्यामध्ये समावेश असतो. अशा व्यक्तींना तीन व चार मजली बेड चढणे व उतरणे अतिशय जिकरीचे होते. तसेच दिवसभरामध्ये इतरही काही गोष्टींसाठी सतत बेडवरून चढ-उतार करणे हे रुग्णांना अत्यंत त्रासदायक होत आहे. त्यामुळे सभा घेण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी रुग्णांच्या सुविधांकडे लक्ष अधिक देणे गरजेचे असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.