जळगाव, प्रतिनिधी | सागर पार्क क्रिकेट क्लबतर्फे आयोजित विविध व्यवसायिकांच्या क्रिकेट प्रिमिअर लिगला उद्या (दि.८) सकाळी शानदार प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा दि. ८, ९ व १० नोव्हेंबर रोजी सागर पार्क येथे सकाळी ७.०० ते रात्री १०.०० पर्यंत खेळण्यात येणार आहेत.
खेळाच्या निमित्ताने एकत्र येणारे विविध क्षेत्रातील व्यवसायिक यांचा आपसातील परिचय वाढून स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा व शहराच्या एकंदरीत विकासात या निकोप स्पर्धांच्या निमित्ताने खेळीमेळीचे वातावरण तयार व्हावे, या एकमेव उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन सागर पार्क क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या रकमेच्या शिल्लकीतून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनही करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्ताने शहरातील मुकबधीर शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करण्यात येवून त्यांच्या अल्पोपहाराची व भेटवस्तूंचीही व्यवस्था केली जाणार आहे. तमाम क्रिडाप्रेमी व व्यवसायिक यांना या स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन सागर पार्क क्रिकेट क्लबने केले आहे.