पुतळा विटंबना प्रकरणातील दोन्ही संशयित अटकेत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील दिक्षितवाडी परिसरात असलेल्या तथागत भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटबंना केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दीक्षितवाडी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून करण्यात आलेले आहे. दरम्यान ही जागा खाजगी असल्याने जागामालक प्रशांत शरद देशपांडे आणि अमित एकनाथ पाटील (दोन्ही रा. जळगाव) यांनी १६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता जेसीबीच्या मदतीने पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला होता.

याच्या विरोधात समाज बांधवांनी पुतळ्याच्या ठिकाणी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीव्र आंदोलन केले होते. यावेळी समाज बांधवांनी आक्रमक भूमीका घेतली होती. समाज बांधवांच्या मागणीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मूर्ती आणि पुतळा जैसे थे या अवस्थेत त्याच ठिकाणी पुनर्स्थापीत करण्यात आला होता.

या प्रकरणातील संशयित प्रशांत देशपांडे आणि अमित पाटील यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी अनेक संघटनांनी आंदोलन केले होते. दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत शरद देशपांडे आणि अमित एकनाथ पाटील यांना सोमवारी १० एप्रिल रेाजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीचे हक्क राखीव ठेवून दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

Protected Content