जळगाव प्रतिनिधी । बीएचआर प्रकरणी आज करण्यात आलेल्या अटकसत्रात बड्या धेंडांचा समावेश आहे. मात्र यामागे एक सुसुत्रता दिसून येत आहे. विशेष करून यातील काही जणांच्या माध्यमातून माजी मंत्री आ. गिरीश महाजन आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना टार्गेट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील नवीन सूडचक्राची ही नांदी तर नव्हे ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
आज पहाटेच बीएचआर प्रकरणात तब्बल १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यात औरंगाबाद, अकोला, मुंबई, पुणे येथूनही काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील अटक करणार्यांची पार्श्वभूमि तपासून पाहिली तर यामागे थोडी सुसुत्रता दिसून येत आहे. विशेष करून याला राजकीय आयाम असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आजच्या कारवाईत माजी मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक जितेंद्र पाटील व छगन झालटे यांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही स्थानिक राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. परिणामी या अटकेमुळे गिरीश महाजन यांना टार्गेट करण्यात आल्याची शक्यता आहे. तर, जळगावात भागवत भंगाळे यांच्यासारख्या अतिशय मातब्बर अशा व्यावसायिकावर कारवाई करून आमदार राजूमामा भोळे यांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
आज करण्यात आलेल्या अटकसत्रातील संशयितांवर लावण्यात आलेली कलमे आणि याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र बीएचआरच्या कर्जदारांच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली आहे. बीएचआरचा माजी अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर आणि इतर मंडळीने याच माध्यमातून आपले उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप आहे. यामुळे आता हे प्रकरण गंभीर वळणावर असल्याचे विधी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात, यात अटक करणार्यांचे पुढे काय होणार हे तर येणारा काळच आपल्याला दाखवणार आहे. मात्र या माध्यमातून एक नवीन राजकीय सूडचक्र सुरू होण्याचे स्पष्ट संकेत यातून मिळाले आहेत.
आमदार गिरीश महाजन यांनी मंत्री असतांना जिल्ह्यासह राज्यात एकाच वेळी अनेकांना अंगावर घेतले आहे. यामुळे अधून-मधून त्यांचे राजकीय विरोधक महाजन यांना त्रस्त करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस जळगाव महापालिकेतील सत्तांनर हे आ. गिरीश महाजन आणि आ. राजूमामा भोळे यांना हादरा देणारे ठरले. मात्र यापेक्षा मोठा हादरा आता बीएचआरच्या कारवाईतून या दोन्ही मान्यवरांना बसला आहे. जितेंद्र पाटील हे आ. गिरीश महाजन यांची राजकीय, सामाजिक व आर्थिक सूत्रे सांभाळत असल्याची बाब उघड आहे. यामुळे थेट त्यांच्यावरच हात टाकून महाजनांना इशारा देण्यात आला आहे. तर राजूमामांच्या राजकीय वाटचालीत भागवतशेठ भंगाळे यांचा मोलाचा वाटा देखील उघड असल्याने ही कारवाई त्यांना देखील अस्वस्थ करणारी ठरली आहे.
आमदार गिरीश महाजन हे कसलेले खिलाडी आहेत. राज्याच्या राजकारणातील एक मोठे नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता थेट त्यांच्याच वजीरावर निशाणा लावल्याने ते स्वस्थ बसतील असे वाटत नाही. तर जोडीला आमदार राजूमामा भोळे हे देखील सद्यस्थितीतून मार्ग काढत याच्या पलटवाराचा नक्की प्रयत्न करतील. यामुळे आता जिल्ह्यात नवीन राजकीय सूडचक्र सुरू होण्याची शक्यता देखील बळावली आहे. यात कुणाचे काहीही होवो…बिचार्या ठेवीदारांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी परत मिळणार का ? या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने कुणाकडेच नाही…!!