जळगाव प्रतिनिधी । बीएचआर मल्टीस्टेट सहकारी पतपेढीतील अपहाराबाबत शिक्रापूर पोलीस स्थानकात नवीन गुन्हा नोंदविण्यात आला असून यामध्ये आठ संशयितांचा समावेश आहे.
बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी तिसरी फिर्याद शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली असून, त्या फिर्यादीनुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आठ जणांचा समावेश आहे. यामध्ये सुनील झंवर, महावीर जैन, धरम सांखला, विवेक ठाकरे आणि प्रकाश वाणी यांच्यासह उदय कांकरिया, अजय ललवाणी आणि अजय राठी या तीन नव्या संशयितांचा समावेश आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी लोहगाव येथील संतोष काशिनाथ कांबळे या ५७ वर्षीय इसमाने फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार त्यांचे वडील शिक्षक होते आणि १९९०मध्ये ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेच्या व्याजातून कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून त्यांनी एका वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार बीएचआर पतसंस्थेच्या भीमा कोरेगाव आणि शिक्रापूर येथील शाखांमध्ये स्वत:च्या आणि पत्नी मंदाकिनी कांबळे यांच्या नावावर मुदत ठेवीच्या स्वरूपात रक्कम ठेवली. मुदत संपल्यानंतर त्यांना पतसंस्थेकडून एकूण १८ लाख ७ हजार १५९ रुपये मिळायला हवे होते. मात्र, त्यांना पैसे मिळाले नाहीत.
यासाठी त्यांनी अनेकदा अवसायकांनाही संपर्क केला. मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत. तिथे असलेल्या काही जणांनी त्यांना या पतसंस्थेचे मोठे रॅकेट असून, त्यात जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, सुनील झंवर, महावीर जैन, अजय राठी हे ते रॅकेट चालवतात. त्यांचे काही एजंट असून, त्यात विवेक ठाकरे, अजय ललवाणी, उदय कांकरिया यांचा समावेश आहे आणि ऑडिटर धरम सांखलाही त्यांना सामील आहेत असे सांगितले. संतोष कांबळे यांनी त्यांच्याशीही संपर्क केला. पण त्यांना एक पैसा देखील मिळाला नसल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार वरील आठ जणांविरुद्ध विविध १४ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे संतोष कांबळे यांच्या फिर्यादीत त्यांनी सुरेशदादा जैन आणि त्यांचे पुत्र राजेश सुरेश जैन यांचाही संस्थेचे पदाधिकारी म्हणून उल्लेख केला आहे. मात्र त्यांच्या विरूध्द आरोप ठेवण्यात न आल्याने त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. (jalgaon BHR Scam)