जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कानळदा येथील एटीएम दगडाच्या मदतीने फोडण्याचा प्रयत्न फसला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील बसस्थानक येथे स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम लावण्यात आलेले आहे. रविवारी १२ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एटीएम व्यवस्थित होते. दरम्यान, मध्यरात्री एकाने दगड मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेवून माहिती घेण्यात आली. पोलीसांनी पथक तयार करून कारवाईची सुचना देण्यात आली. त्यानुसार मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, संशयित आरोपीचे नाव देण्यास पोलीसांनी टाळाटाळ केली असून या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव तालुका पोलीस कर्मचारी करीत आहेत.