जळगाव प्रतिनिधी । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटसमोरील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने सुरू केलेल्या बांधकामांमध्ये अनियमितता होत असल्यने हे काम रद्द करण्यात यावे अशी मागणी संचालकांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
जळव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संचालकांची बैठक झाली. यात संचालकांनी सभापतींकडे सामूहिक पत्र देऊन शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम आर्थिक अनियमितेमुळे रद्द करण्याची मागणी केली आहे. बीओटी तत्त्वावर असलेले हे काम विकासक पराग कन्स्ट्रक्शनचे संदीप भोरटक्के यांनी घेतले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बांधकाम होणे आवश्यक होते; मात्र विकासकाने प्रत्यक्षात अडीच हजार स्क्वेअर फूट जास्तीचे बांधकाम केले आहे. सुधारित नकाशानुसार नापरतावा रक्कमदेखील ८ कोटींच्या पुढे गेलेली आहे. संबंधित बँकेची गॅरंटी वैधतादेखील संपल्याने शॉपिंग कॉम्प्लेक्स संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची लेखी मागणी संचालकांनी सोमवारी झालेल्या बैठकीत केली. यासंदर्भात विकासकाला २० नोटिसा दिल्या आहे. येत्या बैठकीत हा विषय अजेंड्यावर घेण्याची मागणी संचालकांनी पत्राद्वारे केली आहे.