सरकार वीज ग्राहकांची क्रूर चेष्टा करतयं-जगन्नाथ बाविस्कर

चोपडा प्रतिनिधी । राज्य सरकार वीज ग्राहकांची क्रूर चेष्टा करत असून वाढीव बिलांबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत वृत्त असे की, लॉकडाऊन काळातील एकत्रित वाढीव वीज बिलांबाबत राज्य सरकारकडून अजूनही ठोस निर्णय घेतला जात नसून महावितरण वीज ग्राहकांकडून जबरदस्त लूट करीत आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकांवर बैठका होऊन सुद्धा वीज ग्राहकांना अजूनही दिलासा मिळत नाही. मी याआधीच्या पत्रकात वाढीव वीजबिलां बाबतच्या वल्गना पूर्ण होतील का ? तसेच सरकार व महावितरण कडुन वाढिव वीज बिलात दुरुस्ती करून सूट देतील का ? असा खडा सवाल व शंका व्यक्त केली होती. पण ती शक्यताही आता मावळली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही, तसेच ऊर्जामंत्री यांनी याबाबत चर्चाही केली नाही. असे वृत्त सरकारशी संबंधित विश्‍वस्तसूत्रांनी व एका मंत्र्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर प्रकाशित झाले आहे. याचाच अर्थ राज्यसरकार व महावितरण एकत्रित वाढीव वीज बिलांबाबत वीजग्राहकांची क्रूर चेष्टा करीत आहे, असा आरोप चोपडा तालुका वाढीव वीजबिलांबाबतचे आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी या पत्रकान्वये केला आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, यापुढे वीज ग्राहकांना आमरण उपोषणाचेच अस्त्र वापरावे लागणार आहे. जोपर्यंत वीज बिलात दुरुस्ती होऊन सूट मिळत नाही, तोपर्यंत वीज बिल भरूच नयेत. तसेच महावितरणला वीज कनेक्शन कट करू देऊ नये, असेही आवाहन आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर,लखिचंद बाविस्कर, मधुसूदन बाविस्कर,मुरलीधर बाविस्कर, सागर सोळुंके, वैभवराज बाविस्कर, मोतीलाल रायसिंग, भगवान कोळी, गव्हरलाल बाविस्कर, सतिश बाविस्कर, संजय सैंदाणे, सुरेंद्र सोनवणे, श्रीकृष्ण सिरसाठ,भगवान वैदु, विशालराज बाविस्कर यांनी केले आहे.

Protected Content