फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | कोरोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी जेरीस आले असून याचा आपल्या जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. या बाबीची दखल घेऊन सामाजिक जाणीवेतून येथील जे. टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालयात अत्यल्प मूल्यात इंजिनिअर बनण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संदर्भात वृत्त असे की, सध्या इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. खरं तर अभियांत्रीकीच्या पदवीसाठी मोठ्या प्रमाणात फी आणि अन्य खर्च लागत असतो. मात्र यंदा सर्वांचीच आर्थिक स्थिती ही खालावलेली आहे. याला प्रामुख्याने कारण म्हणजे कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेले साईड इफेक्ट अद्यापही पूर्णपणे दूर झालेले नाहीत. अजून देखील अर्थव्यवस्थेला पूर्णपणे गती आलेली नाही.
यातच यंदा अवकाळी वादळी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही प्रकारातील शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. साहजीकच शेतकर्यांसोबत शेतमजूर आणि अन्य घटकांवरही याचा परिणाम झालेला आहे. या पार्श्वभूमिवर, परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य स्थितीतील नागरिकांच्या मुलांना अभियांत्रीकीचे शिक्षण घेता यावे यासाठी जे. टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे.
यंदाची अभियांत्रीकीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कॉंप्युटर, सिव्हील आणि मेकॅनिकल या चार शाखांसाठी प्रवेश घेता येणार आहे. यंदाची स्थिती लक्षात घेता कॉलेजच्या व्यवस्थापनाने एक समाजाभिमुख निर्णय घेतला असून याचा ऍडमीशनसाठी इच्छुक असणार्यांना लाभ होणार आहे. याच्या अंतर्गत मागासवर्गातील ( एससी, एसटी, एनटी आदी) विद्यार्थ्यांना अगदी एकही पैसा खर्च न करता इंजिनिअरिंगची डिग्री घेता येणार आहे. तर जनरल (ईबीसी पात्र) व ओबीसी वर्गवारीतील विद्यार्थ्यांनाही ( प्रति वर्ष ५ ते २० हजार रूपये ) इतकी अत्यल्प फी आकारणी करून इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.
या संदर्भात महाविद्यालयाचे चेअरमन शरददादा महाजन म्हणाले की, जे. टी. महाजन महाविद्यालयाने आजवर सातत्याने समाजाभिमुख भूमिका घेतलेली आहे. सध्याचे आर्थिक अरिष्ट पाहता व्यवस्थापनाने मागासवर्गियांना एक पैसा देखील खर्च न करता तर जनरल वर्गवारीतील विद्यार्थ्यांना अत्यल्प मूल्यात प्रवेशाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. यात कोणत्याही छुप्या अटी-शर्ती नसून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. महाजन यांनी केले आहे. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. के. जी. पाटील यांच्याशी ९६३७०७१२९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.