ओमायक्रॉनचे निदान करणे होणार सुलभ !

मुंबई प्रतिनिधी | कोविडच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार प्रचंड गतीने वाढत असतांना आता याचे तातडीने निदान करण्यासाठीच्या चाचणीला आयसीएमआरने परवानगी दिली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात करोनाच्या नव्या व्हेरिएंटनं भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. ओमायक्रॉन वेगाने जगभर पसरत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.   या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनविरोधातील लढ्यामध्ये एक नवं साधन आरोग्य यंत्रणेच्या हाती आलं आहे.

 

आयसीएमआर म्हणजे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी टाट मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सतर्फे तयार करण्यात आलेल्या आरटी-पीसीआर किटला मान्यता दिली आहे. ओमीश्युअर असं या नव्या टेस्टिंग किटचं नाव आहे. ओमिश्यूअरमुळे आता जेनोम सिक्वेन्सिंगसाठी न पाठवता देखील ओमायक्रॉनच्या संसर्गाचे निदान करणं शक्य होणार आहे. ओमिश्यूअर आरटीपीसीआर किट मुळे ओमायक्रॉनचं लवकरात लवकर निदान करून जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचण्या करणं शक्य होणार आहे.

 

आयसीएमआरनं ३० डिसेबर २०२१ रोजी मंजुरीचं पत्र टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सच्या नावे जारी केलं आहे. यामध्ये, उत्पादकाच्या निर्देशांनुसारच चाचण्या केल्या जात आहेत. यासाठी बॅचनुसार चचण्यांचं सातत्य राखण्याची जबाबदारी ही उत्पादकावरच असेल, असं नमूद करण्यात आलं आहे.

 

 

दरम्यान, भारतात मंगळवारी ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून आलं. आता भारतातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या १८९२ वर गेली आहे. यापैकी ७६६ रुग्ण पुन्हा निगेटिव्ह झाले आहेत. मात्र, यामुळे ओमायक्रॉन वेगाने देशात वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा सर्वाधिक ५६८ इतका आहे, तर दिल्लीमध्ये ३८२ ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत.

Protected Content