मुंबई – कोणत्याही प्रकारच्या मिठाईवर एक्स्पायरी डेट टाकणे बंधनकारक करण्यात आले असून 1 ऑक्टोबरपासून नियम देशभरात लागू होणार आहे.
बाजारात खुल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या मिठाईचीही एक्स्पायरी डेट आता ग्राहकांना समजणार आहे. अन्न नियामक एफएसएसएआयने याबाबत नियम तयार केले आहेत. त्यानुसार ग्राहक कुठल्या तारखेपर्यंत या मिठाईचा आस्वाद घेउ शकतो हे विक्रेत्याला आता सांगावे लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून नियम लागू होणार आहे.
एफएसएसएआयने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, खुल्या स्वरूपात जेथे मिठाईची विक्री केली जाते तेथे ही मिठाई कुठल्या तारखेपर्यंत खाणे चांगले राहील अर्थात बेस्ट बिफोरची तारीख जाहीर करणे आवश्यक आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि खाद्य सुरक्षा निश्चित करण्यासाठी हे ठरवण्यात आले आहे.
मोहरीच्या तेलाच्या संदर्भातही या पत्रात सूचना करण्यात आल्या आहेत. सामान्यत: सर्व घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या तेलात अन्य कोणते खाद्य तेल मिसळण्यासही आता मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शुध्द तेलाच्या उत्पादनाला आणि विक्रीला प्रोत्साहन दिले पाहिजे असेही त्यात म्हटले आहे.