साहित्यिक परंपरा व जाणिवांचा शोध घेऊन मातृभाषांचे संवर्धन व जतन करणे अत्यावश्यक- हिंगोणेकर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ’ साहित्यिक परंपरा व जाणिवांचा शोध घेऊन मातृभाषांचे संवर्धन व जतन करणे अत्यावश्यक आहे ’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक माजी शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक ) शशिकांत हिंगोणेकर यांनी केले.

मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त दि.१८ जानेवारी २०२४ रोजी ‘ मराठी असे आमुची मायबोली ’ कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना हिंगोणेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर होते.आपल्या भाषणात शशिकांत हिंगोणेकर पुढे म्हणाले की, ’ मातृभाषा प्रगतीची भाषा आहे.विद्यार्थ्यांनी भाषा अभ्यासासोबत ती अनुभवली पाहिजे.नष्ट होत जाणार्‍या आदिवासी दुर्मिळ जमातींच्याही लोकभाषा जतन करुन पिढीजात परंपरा व संस्कृती नव्याने अभ्यासली पाहिजे. आपण राजभाषा स्विकारतो पण राजभाषेचा मोठेपणा स्विकारत नाही.बिहार व मध्यप्रदेशात हिंदीतून शिक्षण घेतले जाते मात्र आजही दक्षिण भारतात राष्ट्रभाषा हिंदीला सहेतूक प्राधान्य न देणारा मोठा गट आहे म्हणून राष्ट्रभाषा चिंतन पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे मार्मिक आवाहन शशिकांत हिंगोणेकरांनी केले.सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून भाषा ही सर्वापर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

जगात १९५ देशांनी ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेला प्राधान्यक्रम दिला नाही.जगातील फक्त १० देशांनीच इंग्रजीचा सर्वार्थाने स्विकार केला आहे. इतर सर्व देशांनी आपापल्या देशाची मातृभाषा हीच ज्ञानभाषा म्हणून अंगिकारली आहे.भारतात ६००० बोलीभाषा आहेत. महाराष्ट्रात छोट्या मोठ्या ५२ बोलीभाषा आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासह मराठी भाषा विद्यापीठ होते आहे,याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.ते विद्यापीठ लवकरात लवकर आकारास यावे अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.

कविवर्य शशिकांत हिंगोणेकरांचे केसीई सोसायटीला प्रतिवर्षी साहित्य संमेलन आयोजन व वाड़मयीन पुरस्कार देण्याचे अभिनव विनम्र आवाहन
मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाला प्रा.म.ना.अदवंत, प्रा.राजा महाजन,प्रा. सु.का.जोशी,डॉ.इंदुमती लिमये अशा थोर साहित्यिक प्राध्यापकांची वाड़मयीन समृद्ध परंपरा आहे.त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ना.धो.महानोर,डॉ.किसन पाटील,केशवसूत पुरस्कारप्राप्त कवी शशिकांत हिंगोणेकर,डॉ.साहेबराव भूकन,डॉ.वासुदेव वले,डॉ.प्रकाश सपकाळे, प्रा.धनराज धनगर,नामदेव कोळी,मोरेश्वर सोनार,प्रा.गोपीचंद धनगर अशा विद्यार्थी देखील समृद्ध परंपरा उत्तरोत्तर वर्धिष्णू करीत आहेत.अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून महाविद्यालयाने दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेतले पाहिजे. संस्थापक पितृतुल्य मूळजी जेठा यांच्या नावाने साहित्यिक पुरस्कार दिले पाहिजे. परिणामी सृजनशील साहित्यिक निर्माण होऊन खानदेशची साहित्य परंपरा उत्तरोत्तर वर्धिष्णू होईल. कॉलेजचा ’ अजिंठा ’ वार्षिकांक हा वाड़मयीन त्रैमासिक नियतकालीक म्हणून प्रकाशित करावे असे विनम्र आवाहन माजी विद्यार्थी म्हणून कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी द्रष्टेपणाने केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी,भाषा व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे,दैनदिन जीवनव्यवहारात काव्य व साहित्य नेहमीच बळ देत आले आहे,मराठी भाषेतून रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.गोपीचंद धनगर यांनी केले.याप्रसंगी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.विद्या पाटील,डॉ.योगेश महाले,डॉ.विलास धनवे,प्रा.संजय हिंगोणेकर,डॉ.जयेश पाडवी,डॉ.अतुल पाटील,प्रा.रेणुका झांबरे,विजय लुल्हे व महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Protected Content