कंटेनमेंट झोन वगळता हॉटेल्स, रिसॉर्ट्स सुरू करण्यासाठी नवी कार्यप्रणाली जारी

मुंबई – राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे.

मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरुन ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेनअंतर्गत शासनाने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचा अंतर्भाव पर्यटन संचालनालयाने जारी केलेल्या एसओपीमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, डब्ल्युएचओ, यूएनडब्ल्युटीओ यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेनुसार ही एसओपी तयार करण्यात आली आहे.

हॉटेल्स आणि रिसॉर्टस् यांनी सर्व प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गन आदींसारख्या साहित्यामार्फत तपासणी करावी. फक्त लक्षणे नसलेल्या पर्यटक तथा प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना तसेच वेटींग रुम आदी सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी संबंधित प्रवाशाची माहिती प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधित प्रवाशाची नाहरकत घेण्यात यावी. प्रवाशांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व आवश्यक ठिकाणी हॅन्ड सॅनिटायजर ठेवण्यात यावा. चलनाची हाताळणी करताना योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि डिजिटल माध्यमातून चलनाची देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन द्यावे. याशिवाय इतरही विविध मार्गदर्शक बाबींचा एसओपीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Protected Content