इस्त्रोची ऐतीहासीक कामगिरी : एकाच वेळेस ३६ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा-वृत्तसंस्था | भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थान इस्रोने दिवाळीच्या मुहूर्तावर ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे.

इस्रोकडून काल रात्री सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या एलव्हीएम-३ याच्या माध्यमातून पहिले व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून मध्यरात्री १२ वाजून ०७ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणाद्वारे ३६ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यात आले आहेत.

वनवेब ही एक ब्रिटिश खासगी उपग्रह कंपनी असून इस्त्रोने त्यांचे ३६ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. या माध्यमातून इस्रोने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सर्विस मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. भारताने ब्रिटनशी त्यांचे १०८ उपग्रह प्रक्षेपीत करण्याचा करार केला असून याच्या अंतर्गत या ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.

एलव्हीएम-३ हे रॉकेट ४३.५ मीटर लांब असून आणि त्यात आठ हजार किलोपर्यंत उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच २०२३ मध्येही याच रॉकेटच्या मदतीने आणखी ३६ वनवेब उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. दरम्यान, इस्त्रोने केलेली ही कामगिरी ऐतीहासीक मानली जात आहे.

Protected Content