नवीदिल्ली, वृत्तसंस्था | पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये यश मिळाले नसले तरी भविष्यात पुन्हा एकदा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न करण्यात येईल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे. ते येथे बोलत होते. आम्ही सुद्धा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करु शकतो, हे दाखवून देण्यासाठी इस्त्रो कटिबद्ध आहे. त्यासाठीच्या योजनेवर काम सुरु आहे, अशी माहिती सिवन यांनी यावेळी दिली.
७ सप्टेंबरला चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरच्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगमध्ये इस्रोला यश आले नव्हते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या काही मिनिटे आधी ‘विक्रम’चा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. चंद्रावर विक्रम लँडरचे नेमके काय झाले ? ते अजून स्पष्ट झालेले नाही. विक्रम लँडरच्या लँडिंग संबंधीचा महत्वाचा डाटा अवकाश संस्थेकडे उपलब्ध आहे.
लँडिंग संदर्भात सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवून आणण्यासाठी अमूल्य माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. नजीक भविष्यात इस्रो अनुभव, ज्ञान आणि टेक्निकल क्षमतेद्वारे आम्ही चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करु शकतो, हे जगाला दाखवून देईन असेही सिवन म्हणाले. सूर्याच्या दिशेने यान पाठवण्यासह मानवी अवकाश मोहिमेची तयारी व्यवस्थित सुरु आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये उपग्रह प्रक्षेपणाच्या मोहिमांची योजना आहे, असेही सिवन यांनी सांगितले.
नासा पुन्हा‘विक्रम लँडर’ला शोधण्यात अपयशी
नासाच्या ऑर्बिटरला दुसऱ्या प्रयत्नातही विक्रम लँडरला शोधून काढता आलेले नाही. नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर १४ ऑक्टोबरला विक्रमच्या लँडिंग साइटवरुन गेला. नासाच्या एलआरओने लँडिंग साइटच्या जागेचे वेगवेगळे फोटो काढले. पण त्यानंतरही विक्रम लँडरचा शोध लागू शकलेला नाही.
विक्रम लँडर सावल्यांखाली झाकला गेल्यामुळे त्याचे स्पष्ट फोटो मिळत नसावेत, असे नासाचे म्हणणे आहे. यापूर्वी १७ सप्टेंबरला एलआरओ ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साईटवरुन गेला होता. १७ सप्टेंबरला संधी प्रकाशाची वेळ असल्याने विक्रमच्या लँडिंग साइटचे स्पष्ट फोटो मिळू शकले नव्हते. त्यामुळे १४ ऑक्टोबरला ते मिळण्याची अपेक्षा होती. पण यावेळी सुद्धा ठोस पुरावे मिळू शकलेले नाहीत.